‘अनाकलनीय ‘ राज – उद्धव सोहळा.! – डॉ.सुरेश सिरसिकर (सामाजिक कार्यकर्ते )

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : दि.६/०७/२०२७
मध्यंतरी राज ठाकरे यांनी कुंभ मेळ्यातील स्नानाबद्दल वक्तव्य केलेलं होतं, त्यावेळी मी त्या पोस्ट वर कमेंट केलं होतं ते म्हणजे ” हे प्रबोधनकारांचे रक्त आहे त्यामुळे ते उफाळून येणारच” आणि आजच्या राज – उध्दव यांच्या हिंदी भाषेच्या सक्ती विरुद्ध “आवाज मराठीचा” कार्यक्रमातून सिद्ध झालं.
“जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवेन” मला एक संधी द्या असे म्हणणारे राज ठाकरेंना मराठी मुद्द्यावर २००९ च्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळालं. पहिल्याच दणक्यात १३ आमदार विधानसभेत पोहोचले आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना अधिकृत प्रादेशिक पक्ष बनला पण त्यानंतर या पक्षाला उतरती कळा लागली. कारणे अनेक आहेत. मला त्या कारणात जायचं नाही. २०१४ ला राज ठाकरे एकमेव असा नेता होता जो फक्त विकासावर बोलत होता, आपल्या ब्ल्यू प्रिंट ची PPT च त्याने प्रत्येक सभेत दाखविली पण मोदी हवेत लोकांच्या डोक्यात ती गेली नाही. २०१९ च्या निवडणुकीत देशभरात कुणाचे भाषणे गाजली तर राज ठाकरे यांची गाजली. “लाव रे व्हिडिओ” म्हणून मोदी सरकारची संपूर्ण पोलखोल करीत होते. त्यांच्या भाषणासाठी उत्तरेतून मागणी येत होती. ‘ लिबरल नेत्यांचा हिरो ‘ असे त्यांना संबोधू लागले. पण राज ठाकरेंच्या भाषणाचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला, मनसेचा फक्त एक उमेदवार निवडून आला. पण या निवडणुकीत मनसे ची मतदानाची टक्केवारी वाढली होती. पण निवडणुकीनंतर “लाव रे व्हिडिओ” चा वचपा मोदी सरकारने काढला आणि राज ठाकरेंना ईडी च्या जाळ्यात अडकवले. त्यावेळी राज ठाकरें भाजपला सत्तेपासून दूर करण्यासाठी सगळे पक्ष एकत्र करून आघाडी करण्याचा प्रयत्न करीत होते, पण ते यशस्वी झाला नाही. शेवटी ईडी च्या कारवाई नंतर त्यांची आणि त्यांच्या पक्षाचीच भूमिका बदलली, झेंडा बदलला, महाराष्ट्र हृदयप्रमुख आता हिंदु जननायक झाले, भगवी शाल घातली. आणि भाजपला बिन विरोध पाठिंबा दिला. पण भाषणात पूर्वीसारखा रोब दिसून येतं नव्हता, आपण जे बोलतोय, ते स्वतःलाच कन्व्हिन्स नाहीत की काय ? असे पाहताना वाटायचे. नाईलाजास्तव बोलत आहेत की काय असे वाटत होते. पण भाजपाचाही राज ठाकरेंना फायदा झाला नाही. पण त्यांचं मध्ये मध्ये प्रबोधनकारांचं रक्त उफाळून येत असे. त्यांना आधीपासूनच भाजपापासून देश आणि राज्य सुरक्षित नाहीत याची जाणीव होती. त्यामुळे आज मराठी मुद्द्यावर परत उद्धव ठाकरे सोबत येऊन आपल्या मूळ ट्रॅकवर आले आहेत.
आज व्यासपीठावर राज – उद्धवला बघून महाराष्ट्रातील मराठी जनतेचा आनंद गगनात मावत नव्हता विशेषत: मुंबईचे मराठी लोकांना आपला महाराष्ट्र हृदय प्रमुख मिळाला, गेली अनेक वर्षापासून मुंबईत मराठी माणसांची गळचेपी होत होती, गुजराती मराठी लोकांच्या मानगुटीवर बसले होते. आजच्या सोहळ्यामुळे, राज ठाकरे मूळ ट्रॅकवर आल्यामुळे मुंबईतील मराठी माणसाला मानसिक बळ मिळाले आहे. मनसे आणि उबाठा युती झाली आणि टिकली तर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत तसेच महाराष्ट्राच्या निवडणुकीत यांना घवघवीत यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. महाराष्ट्रातील मोठा प्रादेशिक पक्ष बनेल, यात शंका नाही. महाराष्ट्रातील राजकारण बदलून जाईल. पण या दोघांनी उभा महाराष्ट्र पिंजून काढलं पाहिजे.

डॉ. सुरेश सिरसीकर सामाजिक कार्यकर्ते 9146040000