शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथे जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस उत्साहात साजरा
IMA महाराष्ट्र AMS यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस मोठ्या उत्साहात साजरा

छत्रपती संभाजीनगर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर येथील प्लास्टिक सर्जरी विभाग, प्लास्टिक सर्जरी असोसिएशन, IMA महाराष्ट्र AMS यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे उपाधिष्ठाता व सर्जरी विभागाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण सूर्यवंशी, महाराष्ट्र प्लास्टिक सर्जरी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. जितेन कुलकर्णी, उपाधिष्ठाता डॉ. विनोद मुंदडा, डॉ. गायत्री तडवळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वैद्यकीय विद्यार्थी, प्लास्टिक सर्जन आणि विविध विभागप्रमुखांनी “हितगुज” या चर्चासत्रात उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. उज्वला दहिफळे यांनी केले. त्या म्हणाल्या, “प्लास्टिक सर्जरी म्हणजे केवळ चेहरा बदलणे किंवा भाजल्यावर त्वचा चिटकवणे नाही, तर ही एक प्रगत, वैज्ञानिक आणि कलात्मक शाखा आहे. ‘प्लास्टिक’ हा शब्द ग्रीक भाषेतील ‘प्लास्टिकोस’ या शब्दावरून घेतला असून, त्याचा अर्थ ‘आकार देणे’ असा होतो. भारतीय शास्त्रज्ञ सुश्रुत यांनी प्राचीन काळातच पुनर्निर्माण शस्त्रक्रियेचे वर्णन केले असून, आजची प्लास्टिक सर्जरी ही त्याच परंपरेचा आधुनिक विस्तार आहे.”
तसेच, त्या म्हणाल्या, “सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची संख्या सतत वाढत असून, अधिष्ठाता डॉ. सुक्रे व डॉ. वैशाली उणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमची टीम उत्कृष्ट सेवा देत आहे. घाटी हॉस्पिटलमधील मोफत औषधोपचारामुळे आमच्या शस्त्रक्रिया अधिक परिणामकारक होतात.”
डॉ. शिवाजी सुक्रे यांनी सर्व सुपर स्पेशालिटी डॉक्टर्सच्या कार्याची प्रशंसा केली व सांगितले की, “कोणतीही गोष्ट रुग्णसेवेसाठी अपुरी पडू दिली जाणार नाही. वैद्यकीय महाविद्यालय आता मराठवाडा आणि खानदेशातील रुग्णांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे; त्यामुळे पुणे-मुंबईला जाण्याची गरज उरलेली नाही.”
डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांनी “फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुश्रुत यांच्याविषयी माहिती दिली आणि अशा चर्चासत्रातूनच खरे वैद्यकीय विद्यार्थी घडतात, असे मत व्यक्त केले.
डॉ. जितेन कुलकर्णी यांनी विविध रुग्णांवर झालेल्या शस्त्रक्रियांचे ऑडिओ-व्हिज्युअल सादरीकरण करत विद्यार्थ्यांशी चर्चा केली. कार्यक्रमाच्या समारोपात डॉ. वैशाली उणे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.जागतिक प्लास्टिक सर्जरी दिवस साजरा करण्यासाठी प्लास्टिक सर्जन्स डॉ. रमाकांत बेंबडे डॉ. मंगेश तांदळे डॉ. राम चिलगर डॉ. अनुराधा पाटील डॉ. अमित पाटील डॉ. मयूर गोकलानी डॉ. आशिष कासट डॉ. चैतन्य पाटील डॉ. तायडे डॉ. सचिन जंगले डॉ. जाकीर मोमीन डॉ. व्यंकटेश कुलकर्णी डॉ. अभिजीत गजभरे डॉ. राजा, डॉ. गुरमीत सिंग यांनी सहकार्य केले.