या वर्षीचा 'शिवजन्मोत्सव' अविस्मरणीय होणार - डॉ.बाळासाहेब थोरात

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवजयंती महोत्सव समीतीच्या वतीने १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात येणार असून शिवजयंतीच्या पूर्व संध्येला क्रांती चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत भव्य दीपोत्सव साजरा करण्यात येणार असून यंदाचा हा “शिवजन्मोत्सव” अविस्मरणीय ठरणार असल्याचे जिल्हा शिवजयंती महोत्सवाचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी (दि.१२) आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

यावेळी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराजभाऊ पवार, माजी अध्यक्ष अनिल बोरसे, कार्याध्यक्ष अभिजीत देशमुख, नंदकुमार घोडेले, राजू शिंदे, प्रा.चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे, राजेंद्र दाते पाटील, कृष्णा बनकर, नागराज गायकवाड, अभिषेक देशमुख, लक्ष्मीनारायण बाखरीया, हर्षदा शिरसाट, मकरंद कुलकर्णी, प्रभाकर मते, विजय वानखेडे, अरविंद जाधव, रामदास जाधव, मिथुन व्यास, हरीश शिंदे, अभिजित थोरात व प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या विविध उपक्रम तसेच कार्यक्रमाबाबत माहिती देताना डॉ. बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे यंदाचे हे ५६ वे वर्ष असून या समितीची स्थापना १९७० मध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज पवार यांनी केली होती. अखंड पणे सातत्यपुर्ण आणि एकात्मतेचा संदेश देणारी एवढी जुनी महोत्सव समिती देशात एकमेव असुन अनेक समाजोपयोगी उपक्रम समितीद्वारे राबविण्यात येत आहे.
संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात यंदाचीही शिवजयंती महोत्सव समिती एकात्मतेचा संदेश देणारी ठरेल असा विश्वास शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने १३ फेब्रुवारी रोजी वेरूळ येथील मालोजी राजे यांच्या गढीवर सकाळी १०.३० वाजता स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मारक यांना अभिवादन करून गढीवर ध्वजारोहण करण्यात येईल. तर १३ ते १९ फेब्रुवारी दरम्यान क्रांती चौक येथे सकाळी ८.३० ते ११.३० वाजे दरम्यान छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून प्रा. चंद्रकांत भराट यांच्या संयोजनात या शिवचरित्र पारायण सोहळ्याचे उद्घाटन सर्व धर्मीय ग्रंथ दिंडीने सकाळी ८ वाजता होईल. यावेळी मराठी, इंग्रजी, उर्दू व सर्व माध्यमांचे शालेय विद्यार्थी छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताहाचे वाचन करतील. तर १४ फेब्रुवारी रोजी शहरातील विविध शाळांच्या परिसरात सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान किल्ले बनवा स्पर्धा होईल. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता क्रांती चौक येथून शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्याची साफ सफाई अभियान राबवून अभिवादन करण्यात येईल. १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते १२ वाजेदरम्यान शहरातील विविध शाळांमध्ये शालेय स्तरावर चित्रकला स्पर्धांचे शाळेच्या सोयीनुसार आयोजन करण्यात आले आहे. १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.३० ते ७.०० दरम्यान भव्य दीपोत्सव, ७ ते ९ या वेळेत शिवजन्मोत्सव सोहळा, पोवाडे तर रात्री ११.३० ते ११.५५ या वेळेत भव्य दिव्य अशी फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. तर १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ८.३० वाजता क्रांती चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात येणार आहे. तर दुपारी १२ ते सायंकाळी ६ वाजेदरम्यान शिवगीत व कविता वाचन होईल. तर रात्री ९.४५ ते १० वाजेदरम्यान महाराष्ट्र राज्य गीताचे सामुहिक गायन होईल तर सायंकाळी ६ ते रात्री ११.५५ दरम्यान ध्वनीक्षेपकांवर शिवगीत वाजवून विविध सांस्कृतिक कार्यक्रम स्थानिक कलावंतांच्या सहभागाने सादर होणार असल्याचे शिवजयंतीचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.या शिवजन्मोत्सव सोहळ्यात प्रत्येक शिवभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
सचिन लिला सुखदेव अंभोरे
मो. 9970409640
प्रसिद्ध प्रमुख छत्रपती संभाजीनगर जिल्हा शिवजयंती उत्सव समिती -२०२५