ध्वजारोहण करून शिवचरित्र पारायणाने “शिवजन्मोत्सव” सोहळ्याला सुरुवात

छत्रपती संभाजी नगर | दि. १३ : जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने “शिवजन्मोत्सव” सोहळ्याला उत्साहात गुरुवारी (दि.१३) सुरुवात झाली. वेरूळ येथील मालोजी राजे यांच्या गढीवर सकाळी १०.३० वाजता स्वराज्य संकल्पक शहाजीराजे स्मारकास अभिवादन करून मालोजीराजे गढीवर ध्वजारोहण करण्यात आले.
संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या या ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब थोरात, माजी अध्यक्ष अनिल बोरसे, कार्याध्यक्ष अभिजित देशमुख, राजेंद्र दाते पाटील, महेश उबाळे, प्रसिद्धी प्रमुख सचिन लिला सुखदेव अंभोरे, प्रकाश मिसाळ, श्रीमती अनिता बोरसे, सरपंच रियाज शेख, सतीश कौशिकी, योगेश टोपे, सचिन जाधव, आकाश ठाकरे, सतीश काळे, राजकुमार पांडे, नागेश घुले, अक्षय जाधव, घृष्णेश्वर देवस्थानाचे योगेश कोपरे नागेश घुले, अक्षय जाधव, आदींची यावेळी उपस्थिती होती. ध्वजारोहण प्रसंगी उत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. बाळासाहेब थोरात म्हणाले कि, परंपरेनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजन्मोत्सवाला सुरुवात झाली असून मालोजी राजे गढीवर ध्वजारोहण करत छत्रपती शहाजी महाराजांना अभिवादन उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार प्रत्येक घराघरात पोहचले पाहिजे या हेतूने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन यावेळी अध्यक्ष थोरात यांनी केले. तर कार्याध्यक्ष अभिजित देशमुख म्हणाले कि, छत्रपती शहाजी महाराजांच्या स्मारकाचे तसेच परिसराच्या सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. स्मारकाच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने ५०० कोटीचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार यांचे मी आभार मानतो, तर माजी अध्यक्ष अनिल बोरसे म्हणाले कि, पुरातत्व खात्याला सातत्याने आम्ही पाठपुरावा केला. त्यामुळे निधी मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज या वेरूळ परिसरात राहत होते याचा सर्वांनाच अभिमान आहे. छत्रपती शहाजी महाराजांच्या स्मारकाच्या विकासासाठी सर्वच पक्षातील पदाधिकारी एक बैठक घेऊन आगामी काळात पाठपुरावा करतील आणि या ऐतिहासिक स्मारकाचा लौकिक जगभरात पोहचवतील असा मला विश्वास आहे.
*छत्रपती शिवचरित्र पारायण वाचनाला सुरुवात…*सकाळी ८.३० ते ११.३० वाजे दरम्यान १३ ते १९ फेब्रुवारी कालावधीत क्रांती चौक येथे छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह प्रा. चंद्रकांत भराट यांच्या संयोजनात सुरवात करण्यात आला. या शिवचरित्र पारायण सोहळ्याचे उद्घाटन सर्व धर्मीय ग्रंथ दिंडीने करण्यात आले. यावेळी हिंदू, मुस्लीम, सिख, इसाई… हम सब शिवछत्रपती के शूर सिपाही अशा घोषणा देत मराठी, इंग्रजी, उर्दू व सर्व माध्यमांचे शालेय विद्यार्थ्यानी छत्रपती शिवचरित्र पारायण वाचनाला सुरुवात केली. या पारायनात दोन हजारहून अधिक विद्यार्थ्यानी मोठ्या उत्साहात आपला सहभाग नोंदविला.
शुक्रवारी विविध शाळांमध्ये किल्ले बनवा स्पर्धा…*छत्रपती शिवरायांच्या गडकिल्यांचे संवर्धन व्हावे व हे गड किल्ले प्रत्येक येणाऱ्या पिढीला माहित असावेत या उद्देशाने जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने शुक्रवारी (दि.१४) शहरातील विविध शाळांच्या परिसरात सकाळी १० ते १२ वाजेदरम्यान किल्ले बनवा स्पर्धा उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्याना उत्सव समितीच्या वतीने पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार असून या अभिनव उपक्रमात शालेय विद्यार्थ्यानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ.बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.