वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते झाले.
"महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळयाचे अनावरण माझ्या हस्ते झाले याचा मला मनस्वी आनंद आहे" - केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

द फ्रेम न्यूज नेटवर्क
छत्रपती संभाजीनगर, दि.१८ एप्रिल,छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिकेच्या कॅनॉट गार्डन येथे आज महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झाले.केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, “महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळयाचे अनावरण माझ्या हस्ते झाले याचा मला मनस्वी आनंद आहे. हा पुतळा प्रेरणा, आदर्श, साहस यांचे खरे प्रतिक आहे. महाराणा प्रतापसिंह हे देशाचे जननायक आहेत, त्यांची प्रेरणा आजच्या पिढीने घेण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रतापसिंह यांचा खरा इतिहासही आजच्या पिढीने जाणून घ्यावा. या महापुरूषांनी कधीही भेदभाव केला नाही, त्यांनी कायम जनहितासाठी कार्य केले. देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात हे महापुरूष स्वातंत्र्य विरांचे प्रेरणास्थान राहीले आहेत”.महाराणा प्रतापसिंह यांनी समाजाला संघटीत करण्याचे मोठे काम केले. सर्व समाज घटकांनी त्यांना साथ दिली असून त्यांचे कार्य कायम प्रेरणादायी ठरणारे आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये उभारलेला त्यांचा पुतळा आपल्याला कायम शौर्याची व त्यांच्या विरतेची प्रेरणा देत राहील, नव्या पिढींने त्यांचा आदर्श समोर ठेवत वाटचाल करावी, असे आवाहनही संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केले.असा उल्लेख त्यांनी केला.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, “वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा अश्वारूढ पुतळा हा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आला आणि भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी त्याचे अनावरण केले, याचा आनंद आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरीकडे वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा आहे. त्यामुळे प्रेरणेची कमतरता या ठिकाणी असणार नाही. महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त, देशभक्त होते, ते शेवटपर्यंत देशासाठी लढत राहिले. स्वराज्यासाठी महाराणा प्रतापसिंह, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी आपल्या जीवनाचे बलिदान दिले पण मोगलांचे कधीही मांडलिकत्व स्वीकारले नाही. आज आपण खऱ्या अर्थाने या वीरपुरूषांमुळेच स्वातंत्र्य उपभोगत आहोत. या ठिकाणी असलेला महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा केवळ पुतळा नाही तर एक प्रेरणास्त्रोत आहे. या वीर पुरूषांच्या प्रेरणास्त्रोताच्या माध्यमातूनच स्वतंत्र भारताला विकसित भारताकडे नेण्याचा संकल्प देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केला जात आहे”, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले, “मी महानगरपालिकेत असताना महाराणा प्रतापसिंह यांच्या पुतळयाबाबतचा ठराव घेण्यात आला.आज अतिशय सुंदर जागेत त्यांचा पुतळा उभारण्यात आल्याने खऱ्या अर्थाने आमचे स्वप्न पुर्ण झाले आहे”.
मंत्री अतुल सावे यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी महाराणा प्रतापसिंह यांचा पुतळा उभारण्याबाबतचा प्रवास विशद केला. याप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, पणन मंत्री जयकुमार रावल, विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, खा. डॉ. भागवत कराड, खा. संदीपान भुमरे, आ. प्रदीप जैस्वाल, आ. नारायण कुचे, आ. अनुराधा चव्हाण, आ. संजय केनेकर, महाराणा प्रतापसिंह यांचे वंशज लक्ष्यराज सिंह यांच्यासह महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत उपस्थित होते.आभार मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांनी मानले.यावेळी नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.