छत्रपती संभाजीनगरताज्या बातम्यामहाराष्ट्रलेख
Trending

ज्ञानाचा कल्पतरू, मानवतेचा महामेरू...!

संपूर्ण जगाला आपल्या ज्ञानशक्तीने आणि मानवकल्याणाच्या विचाराने प्रभावित केले

खरोखरंच भारतभूमी वीररत्नांची खाण आहे. या भूमित जन्मलेल्या या वीररत्नांनी भारतालाच काय? संपूर्ण जगाला आपल्या ज्ञानशक्तीने आणि मानवकल्याणाच्या विचाराने प्रभावित केले. त्यांनी केलेले कार्य आणि मांडलेले जनकल्याणाचे विचार आपल्याला विचार करायला अन ते विचार अनुसरायला भाग पडतात. एवढेच नव्हे, तर त्यांनी मांडलेले विचार अन कार्य हेच खरे मानवी जीवनाला अर्थ देऊन ते सार्थ ठरवण्याचा मूलमंत्र देतात. मानवी जीवनाचा खरा अर्थ शिकवून, त्यातच जगाचे कसे कल्याण आहे? याची साक्ष आणि प्रचीती देतात. ज्यांनी आपल्या वैयक्तिक सुखापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी आपले जीवन, कुटुंब आणि उपभोग्य इच्छांची होळी करून, राख करून त्या राखेच्या खतापासून नवसमाज आणि मानव कल्याणाचे विचार निर्माण केले. असे अनेक नरवीर रत्न या आपल्या मातीने जन्मास घातले, अशाच वीर रत्नांपैकी एक रत्न आहेत, ते म्हणजे भारत रत्न, डॉ. बाबासाहेब रामजी आंबेडकर.सामाजिक व्यवस्था कोणतीही असो, पण तिचे अस्तित्त्व जनसामान्यांच्या स्वीकारावर अवलंबून असते. ती जर सर्व कल्याणकारी असेल तरंच तिला सार्वभौमत्व प्राप्त होते, अन त्या व्यवस्थेच्या अंतर्गत समाजाचे परिचलन होत असते. पण, समाज हा नित्य प्रवाही असल्याने समाज व्यवस्थेत निरंतर बदल आणि परिवर्तन ही सामाजिक मागणी असते. ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह आपल्या कवेतील टाकाऊ आणि तिच्या प्रवाहास अडथळा करणारे घटक बाजूला सारून आपला निखळ प्रवास निश्चित करतो, त्याचप्रमाणे डॉ. बाबासाहेबांनी समाजविकास प्रवाहातील जातीभेद, लिंगभेद उच-निचता, अंधश्रद्धा, अज्ञान, आणि अमानवीयकृती असे अनेक घटक सामाजिक विकासप्रवाहास कसे घातक आहेत? हे पटवून देऊन, सामाजिक क्रांती केली. शतकानुशतके पिचलेल्या समाजघटकास आत्मभान दिले आणि त्यांची आत्मजागृती केली.कोणतीही सामाजिक व्यवस्था कितीही श्रेष्ठ आणि समाजोभिमुख असली तरी ती त्याचप्रमाणे अनंतकाळापर्यंत आणि कायमस्वरूपी त्याचप्रमाणे अबाधित राहू शकत नाही. जरी संस्थापकांनी, व्यस्थापकांनी त्या व्यवस्थेच्या निर्मितीच्या वेळी सर्व समाजाच्या कल्याणाचा दृष्टिकोन ठेवून त्या व्यवस्थेची निर्मिती केली असली तरी, त्यात कालांतराने अनेक समाज विघातक अन सामाजिक शोषण करणारे स्वार्थी आणि संधिसाधू समाजकंटक त्या व्यवस्थेचा आपल्या स्वार्थासाठी उपयोग करून संपूर्ण समाजाला आपले अंकित बनवून समाजाला घोर अंधारात ढकलून देतात. त्यासाठी ठराविक काळानंतर त्या सामाजिक व्यवस्थेचे चिंतन, अभ्यास आणि जागृतीपूर्वक चिकित्सा होणे गरजेचे असते. अन हीच समाज व्यवस्थेची चिकित्सा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केली. त्यासाठी अखंड ज्ञान उपसना केली. प्रसंगी भौतिक जीवनाच्या सर्व गोष्टीना तिलांजली देऊन, अलौकिक कार्य केले. प्रकांड ज्ञानाची उपासना फक्त आणि फक्त मानवतेच्या स्थापनेसाठी केली. त्यामुळेच ते ज्ञानाचे कल्पतरू आणि मानवतेचे महामेरू म्हणून शोभून दिसणारे भारत मातेचे ते एक अलौकिक वीररत्न आहेत, यात काडीमात्र शंका नाही.

जयभीम 🙏

श्री. सुनील नागनाथ गीते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button