‘मिशन महाग्राम’अंतर्गत शिक्षण कार्यशाळा
शाश्वत विकासात सर्वोच्च स्थान शिक्षणाचेच - जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर,दि.१९(जिमाका)- शाश्वत विकास या संकल्पनेत सर्वोच्च स्थान शिक्षणाचे आहे. शिक्षणाने ज्ञानी झालेला समाज हाच विकास व सुधारणांची पूर्वअट आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानअंतर्गत ‘मिशन महाग्राम’ राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत आज शिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. येथील एमआयटी संस्थेच्या सभागृहात ही कार्यशाळा आयोजीत करण्यात आली. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. शिक्षण उपसंचालक कार्यालयातील शिक्षण निरीक्षक डॉ.सतिष सातव, ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे सह. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपसिंग बयास, जिल्हा कार्यक्रम समन्वयक किरण बिलोरे तसेच विभागातील ८ जिल्ह्यातील १६८ गावांमधील शिक्षक, मुख्याध्यापक व ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाचे ग्राम समन्वयक आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले की, शिक्षणाला शाश्वत विकासात सर्वोच्च स्थान आहे. शिक्षणात सुधारणा करणे हा इतर सुधारणांचा पाया होय. शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करणे म्हणजे विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे. आपले विद्यार्थी हे जागतिक स्पर्धेत सक्षम ठरावे यादृष्टीने त्यांच्या क्षमतांचा विकास करणे आवश्यक आहे. वाचन, लेखन, गणिती क्षमतांसोबतच त्यांचे आकलन करणे, विचार करणे ते विचार व्यक्त करणे यासारख्या क्षमताही विकसित करणे आवश्यक आहे. आपण आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत जितके सतर्क असतो तितकेच आपल्याकडे शिक्षणासाठी सोपविलेल्या मुलांबाबतही सतर्क असणे आवश्यक आहे,असे त्यांनी उपस्थित शिक्षकांना उद्देशून सांगितले.
ज्ञान हे सतत अद्यावत होणे आवश्यक असते. त्यासाठी वाचन संस्कृतीला चालना देणे आवश्यक आहे. शिक्षक आणि डॉक्टर हे दोन व्यवसाय समाजात खूप आदरास पात्र आहेत. या दोन्ही घटकांनी आपल्या कर्तव्यात कसूर, हयगय केली तर समाज लयास जाण्याची भिती असते. त्यामुळे शिक्षकांनी आपल्या कर्तव्याबाबत अधिक जागरुक असणे आवश्यक आहे. या सोबतच शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे हे एक मोठे आवाहन असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
दिलीपसिंग बयाज यांनी सांगितले की, ग्राम सामाजि परिवर्तन अभियानांतर्गत उद्योगांकडून प्राप्त होणारा सामाजिक उत्तरदायित्व निधी हा दुर्गम गावांपर्यंत या अभियानामार्फत पोहोचविण्यात येत आहे. त्यातून अनेक समाजोपयोगी उपक्रम ज्यातून लोकांच्या उपजिविकेसारखे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य दिले जात आहे,असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक जिल्हा कार्यक्रम समन्वयक किरण बोन्नेरे यांनी केले. निकेश आमने यांनी कार्यशाळेचा उद्देश सांगितला. तर प्रकल्प समन्वयक सतिष खंदारे यांनी सुत्रसंचालन केले.