राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा
चार खेळाडूंना देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान प्राप्त झाला


नवी दिल्ली : केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये चार खेळाडूंना देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान प्राप्त झाला आहे त्यामध्ये,बुद्धिबळपटू डी गुकेश, भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, पॅरा ॲथलीट प्रविणकुमार आणि नेमबाज मनू भाकर या चौघांना ‘मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार’ जाहीर झाला आहे. तसेच महाराष्ट्रातील कोल्हापूरचा नेमबाज स्वनिल कुसळे आणि सांगलीचा पॅरा ॲथलीट सचिन खिल्लारीसह ३२ जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. नेमबाजीच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे यांच्यासह तीन जणांना द्रोणाचार्य पुरस्कार जाहीर झाला आहे. दिव्यांग जलतरणपटू पद्मश्री मुरलीकांत पेटकर आणि ॲथलीट सूचा सिंग यांना जीवनगौरव अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. फिजीकल इज्युकेशन फाऊंडेशन ऑफ इंडिया या संस्थेला राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कारासह तीन विद्यापीठांना मौलाना अबुल कलाम आझाद चषक जाहीर झाला. एकूण ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्कार साठी निवड करण्यात आले. त्यामध्ये १७ दिव्यांग खेळाडूंचा समावेश सुद्धा आहे. खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा पदक प्रमाणपत्र आणि २५ लाख रुपये देऊन सन्मान केला जातो. आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडूंना १५ लाख रुपयांसह अर्जुनाची मूर्ती आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येतो.१७ जानेवारीला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते या पुरस्कारांचं वितरण करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी सर्व पुरस्कार विजेत्याचं विशेष अभिनंदन करत आगामी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.