बिस्किटात ‘विष टाकून १० कुत्र्यांना संपवले’..!

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : बिस्किटांतून विषप्रयोग करून अज्ञाताने महिला उपनिरीक्षकाच्या पाळीव कुत्र्यासह अन्य चार मोकाट कुत्रे आणि चार पिल्ले असे १० कुत्र्यांचा जीव घेतला. ही घटना गुरुवारी (३० जानेवारी) सकाळी पावणेसातच्या सुमारास पहाडसिंगपुरा भागात घडली.

फिर्यादी उषा राजू घाटे (५२, रा. शुभनगर, पहाडसिंगपुरा) या पोलिस कल्याण विभागात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सकाळी पावणेसातच्या सुमारास त्यांचा लॅब्राडॉग जातीचा पाळीव कुत्रा मैदानावर सोडला होता. पंधरा मिनिटाने त्याला घरात आणून सोडले. त्यानंतर उषा घाटे ह्या पतीसह मॉर्निंग वॉकसाठी गेल्या. साडेआठच्या सुमारास परत आल्यानंतर त्यांचा कुत्रा उलट्या करत असल्याचे दिसले.
तेव्हा शेजारच्या छगन सलामपुरे यांनी त्यांना सांगितले की, मैदानावर कुणीतरी विषारी बिस्किटे टाकली होती. ते त्याने खाल्ली असतील. कुत्र्याला तातडीने पशुवैद्यकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्यासोबत इतरही मोकाट चार कुत्रे आणि चार पिल्लेदेखील ती बिस्किटे खाऊन मृत्यू झाल्याचे उघड झाले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसात अज्ञातांविरुद्ध बीएमएस ३२५ कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.