आता शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण होणार..!
केंद्र शासनाच्या 'पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने' अंतर्गत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण होणार

द फ्रेम न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील सगळ्याच शासकीय कार्यालयात केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजने’ अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व राज्यांमधील शासकीय इमारतींचे १५ डिसेंबर २०२५ पूर्वी सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करणे आवश्यक असून शासनाच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे.
त्याप्रमाणे सर्व शासकीय इमारतींचे विहित मुदतीत सौरऊर्जेद्वारे विद्युतीकरण करावे असे निर्देश उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात यासंदर्भात आयोजित बैठकीत दिले.
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, ” आतापर्यंत राज्यातील ११५७ शासकीय इमारतींवर सौर रूफटॉप प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. तथापि उर्वरित ३३२ शासकीय इमारतींवर हे प्रकल्प तातडीने कार्यान्वित करावे. याबाबत दर तीन महिन्यांनी बैठक घेऊन आढावा घेण्यात येईल.”
महाऊर्जा विभागाने इमारतीवर ज्या दिवशी पॅनल बसवले त्याच दिवशी विद्युत मीटर सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या योजनेअंतर्गत होत असलेली कामे अधिक गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार झाली पाहिजेत असे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे शासकीय इमारतींचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण होणार आहे.