रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यास विलास भुमरे घेणार शपथ
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली फोनद्वारे तब्बेतीची विचारपूस

पैठण मतदार संघ, शिवसेना महायुतीचे नवनिर्वाचित आमदार विलास संदीपानराव भुमरे हे रुग्णालयात उपचार घेत असल्याने विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात शनिवारी (दि. ७) शपथ घेऊ शकत नसल्याने त्यांची विशेष व्यवस्था करून पुढील अधिवेशन किंवा विधिमंडळाच्या सभागृहात त्यांना शपथ दिली जाणार आहे. यासंदर्भात आमदार विलास संदीपानराव भुमरे यांनी विधीमंडळाचे अध्यक्ष तसेच शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांना आपल्या तब्बेतीबाबत ईमेल व लेखी पत्राद्वारे कळविले आहे.

प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती देतांना आमदार विलास संदीपानराव भुमरे म्हणाले की, आमच्या शिवसेना पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी माझ्या तब्बेतीची दोन दिवसापूर्वी फोनवरून विचारपूस केली. ते म्हणाले की राज्यातील महायुतीच्या उमेदवारांना मतदारांनी भरघोस मतांनी निवडून दिले आहे. त्यामुळे महायुतीला कोणतेही बहुमत सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. तु तुझ्या तब्बेतेची काळजी घे आणि आराम करून लवकर बरा हो. अशी अस्थेवाईकपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विचारपूस केली. विधीमंडळाच्या आगामी विशेष अधिवेशनात आमदार विलास संदीपानराव भुमरे यांच्या शपथग्रहण सोहळ्याची विशेष व्यवस्था करून त्यांना विशानसभेच्या सदस्यत्वाची शपथ दिली जाईल असे त्यांच्या पैठण विधानसभा संपर्क कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.