
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे यांनी सभागृहात पंतप्रधान पिक विमा संरक्षण योजनेविषयी विशेष तारांकित प्रश्न उपस्थित केला. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रात पंतप्रधान पिक विम्याचे संरक्षण घेणारे किती प्रमाणात शेतकरी आहेत. यावर केंद्रीय कृषी, अन्न प्रक्रिया, व सहकार मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी लेखी उत्तर देतांना म्हटले आहे कि, २०१६ पासूनच्या खरीप हंगापासून हि योजना सुरु करण्यात आली होती. सदरील ही योजना शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. त्यानुसार छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील १४.५१ लाख शेतकऱ्यापैकी ७.०१ लाख शेतकऱ्यांना पंतप्रधान पिक विम्याचे संरक्षण वर्ष २०२३-२४ मध्ये देण्यात आलेले आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात २४१.८४ लाख शेतकऱ्यापैकी १६०.३९ लाख शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिक विमा संरक्षण योजनेचा लाभ घेतला आहे.

केंद्रीय कृषी, अन्न प्रक्रिया, व सहकार मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, योजनेतील तरतुदी नुसार खरीप हंगामात अन्न आणि तेलबिया पिकांसाठी गेल्या पाच वर्षामध्ये विमा हप्त्यात शेतकऱ्यांचा वाटा २ टक्के आहे. तर रब्बी हंगामासाठी १.२ टक्के इतका आहे. तसेच व्यावसायिक फलोत्पादन पिकांसाठी (खरीप आणि रब्बी दोन्ही हंगाम) ५ टक्के वाटा निश्चित करण्यात आला आहे. काही राज्यांनी आपापल्या अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार विम्याचा काही भाग वाटून घेण्याचाही निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारत सरकार राज्यांसाठी देण्यात येणाऱ्या विम्याच्या सबसिडीत आपले योगदान देत नाही. असेही या लेखी उत्तरात म्हटले आहे.