जिल्हा विकासाच्या आराखड्यात 'कौशल्य प्रशिक्षणास प्राधान्य द्यावे' - डॉ. हर्षदीप कांबळे
"जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होत असून ‘ऑटोहब’ म्हणून् जिल्ह्याची ओळख निर्माण होत आहे."

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा विकासाच्या आराखड्यामध्ये उद्योगाला आवश्यक कौशल्यपूर्ण मनुष्यबळ पुरवण्यासाठी प्रशिक्षण उपलब्धतेला प्राधान्य द्यावे. तसेच वस्तुनिष्ठ उपाययोजनांचा समावेश जिल्हा विकास आराखड्यात करावा,असे निर्देश जिल्ह्याचे पालक सचिव तथा सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ .हर्षदीप कांबळे यांनी आज दिले. ते म्हणाले
” छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक होत असून ‘ऑटोहब’ म्हणून जिल्ह्याची ओळख निर्माण होत आहे.”
” तसेच ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी कौशल्य विकास, तंत्रनिकेतन, उद्योग यांनी समन्वयाने विविध कौशल्य आधारित प्रशिक्षण राबवून कुशल मनुष्यबळ उपलब्धता करण्याच्या उपाययोजनांचा नियोजन आराखड्यात समावेश करावा.”
तसेच ” उत्पादन, निर्यात,पर्यटन, स्थानिक लघुउद्योग, वितरण व्यवस्था, कृषी यासह निर्यात क्षेत्रामध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे.”
” खाजगी संस्थांचे सहकार्य आवश्यक तेथे घेण्यात यावे. लॉजिस्टिक पार्क तयार करुन साठवण क्षमता वाढवणाऱ्या गोदामांची निर्मिती करण्यात यावी.”
” शेतमालावर प्रक्रिया करण्यासही वाव आहे. त्यात मका, भाजीपाला, फळ प्रक्रिया यासारख्या उद्योगाची जास्तीत जास्त युनिट स्थापन करून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करण्यात येईल.”
” पर्यटन वाढीसाठी उपलब्ध दळणवळण व्यवस्थेबाबतही पोलीस,जिल्हा प्रशासन, हवाई वाहतूक व सर्व वाहतूक यंत्रणांचा समन्वय आवश्यक आहे. रस्ते अपघात टाळण्यासाठी अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर करावा; स्टार्टअप कंपन्यांद्वारे रोजगार उपलब्ध करण्याचा जिल्हा विकास आराखड्यात समावेश करावा “असेही त्यांनी सांगितले आहेत.
जिल्हा विकास आराखडा समितीची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, जिल्हा नियोजन अधिकारी भरत वायाळ, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र देसले, रोजगार आणि स्वयंरोजगार विभागाचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे, जिल्हा दुग्धविकास अधिकारी मनीषा हराळ, कृषी ,उद्योग, महिला बालविकास विभागाचे अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.