ताज्या बातम्यामनोरंजनलेख
Trending

शांत झोपेची कला आत्मसात करा..!

आपण भौतिक सुखाच्या मागे लागलो आहोत; जीवनातील समाधान, शांतता हरवत चाललो आहोत

द फ्रेम न्यूज

सौ.किशोरी शंकर पाटील सध्या धावपळीच्या युगात आपण भौतिक सुखाच्या मागे लागलो आहोत. जीवनातील समाधान, शांतता हरवत चाललो असताना,अशावेळी आपण अनेक प्रकारच्या काळजीचे ओझे मनावर घेऊन झोपायला जातो आणि दिवसभरातील चिंता, दुःख, वेदना, नाना प्रकारचे ताणतणाव व आशा- निराशेचे क्षण झोपेत ही आपली पिच्छा सोडत नाहीत. याचा झोपेवर मोठा परिणाम होतो आणि शांत झोप मिळणे दुरापास्त होत आहे.

आपण झोपेचं खोबरे होताना पाहतो. सध्या ही समस्या हल्ली सगळ्यांना भेडसावत आहे. झोप शरीर आणि मनाला विश्रांती देते. पण झोपेत आपण स्वप्नही पाहतो. चांगल्या अथवा वाईट दृश्यांच्या स्वरूपात आपल्या मनात जे काही आहे, ते स्वप्नाच्या माध्यमातून बाहेर निघते. दडपलेल्या इच्छा, भिती स्वप्नात प्रकट होतात. बेडरूममध्ये चांगले चित्र, चांगली प्रार्थना, विचार लावले तर झोपतांना ते बघून वाचून व त्यावर मनन – चिंतन केले असता, त्यामुळे शांत झोप मिळू शकते आणि झोपेपुर्वीचा काळ हा सर्वात महत्वाचा असतो.

झोपण्यापूर्वी जर चिंता तणाव अथवा भितीने ग्रस्त असेल तर तशा मनःस्थितीत झोपू नये. सर्वप्रथम दीर्घ श्वास प्रश्वास करावा. चांगल्या पुस्तकांचा अभ्यास आणि थोडावेळ, भ्रामरी,ओंकार ध्यान, स्वतःला मनाला शांतता देणाऱ्या दृश्यांमध्ये गुंतवून ठेवावे. एखादी चांगली प्रार्थना करून झोपी जावे.

तसेच चांगले संगीत ऐकावे. परंतु ताणतणाव, भिती चिंता नैराश्यात झोपल्याने या भावनांचा मनावर नकारात्मक परिणाम होतो. गाढ झोपेच्या आधी पाच मिनिटे आपल्यासाठी मौल्यवान असतात हे लक्षात ठेवावे.

यावेळी नकारात्मक भावनांना दूर करण्याची कला शिकलो तर या भावनांना कायमचे दूर करू शकतो आणि आनंद, शांती, समाधान, प्रसन्नता, कृतज्ञता, दयाळूपणा इ. भावनेचा समावेश आपल्या जीवनात होऊ शकेल. झोपण्यापूर्वी चार तासांचा विचार आपल्या अवचेतन मनांत रहातो. झोपण्यापूर्वी मनाला स्वयंसूचना देऊ शकतो.

मनाला व्यथित करणाऱ्या समस्यांच्या समाधानाचा विचारही करू शकतो. तसे केल्याने चांगले परिणाम केव्हातरी नक्की मिळतात. बऱ्याच शास्त्रज्ञांना त्यांच्या प्रश्नांचे समाधान स्वप्नात मिळाले होते.

झोपण्याच्या वेळेस आपल्या जवळ एक डायरी असावी ज्यावर आपल्या भावना लिहू शकू. आपल्या इच्छा, स्वप्न, समस्या, प्रश्न इत्यादी गोष्टी आपल्या डायरीत लिहून काढल्या तर मनावर ओझं राहत नाही. त्या लिहून काढल्याने मनही हलके होते. अशाप्रकारे शांत झोप मिळवण्यासाठी साध्यासोप्या उपायांनी झोपेला कला बनवावे. शांत झोपेची कला आत्मसात करा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button