सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणी,परभणी ते मंत्रालयावर लाँगमार्च धडकणार..!
चौकशी कुठपर्यंतआली याबद्दल माहिती प्रशासनाने दिलेली नाही.

द फ्रेम न्यूज
परभणी : सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू होऊन एक महिना झाला, तरी दोषी पोलिसांवर कारवाई झालेली नाही. या घटनेतील सर्व दोषींवर कठोर कारवाई का केली नाही?, या मागणीसाठी आंबेडकरवादी नेते आणि संघटनांनी लाँगमार्च काढण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी दुपारी परभणीतील धरणे आंदोलन स्थळावरून हा लाँगमार्च दुपारी ३ वाजता मुंबईतील मंत्रालयाकडे रवाना झाला. त्यात हजारो अनुयायी सहभागी झाले आहेत. लाँगमार्च रवाना होण्यापूर्वी पोलिस आणि आंदोलकांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूप्रकरणी अद्यापही चौकशी अत्यंत संथगतीने चालू आहे. चौकशी कुठपर्यंतआली याबद्दल माहिती प्रशासनाने दिलेली नाही. सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे कुटुंबीयांना एक कोटीची नुकसान भरपाई द्यावी, दंगलीत विद्यार्थ्यांवर दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घ्यावे, दोषी असणाऱ्यांवर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी आंबेडकरी अनुयायांनी लॉँगमार्च काढण्याचा निर्णय घेतला.
शुक्रवारी १७ जानेवारीला परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून सुरुवात झाल्यानंतर हा लॉँगमार्च मंत्रालयापर्यंत जाणार आहे. लॉँगमार्च जसा पुढे जाईल, तशी सहभागी आंदोलकांची संख्या वाढेल, असे संयोजन समितीने सांगितले आहे. सुधीर साळवे, आकाश लहाने, राहुलकुमार साळवे, गौतम मुंढे, सुधीर कांबळे यांच्यासह हजारो अनुयायी सहभागी झाले आहेत.
परभणीतून सुरू झालेल्या लाँगमार्चचा पहिला मुक्काम १० किमीवरील टाकळी (कु.) येथे झाला. १८ रोजी दुसरा मुक्काम बोरी, ५० किमीवरील रांजेगाव येथे तिसरा, २० रोजी देवगाव फाटा येथे ७० किमीवर चौथा मुक्काम आहे. आशिष वाकोडे हे लॉँगमार्चचे नेतृत्त्व करत आहेत.परभणीतून सुरुवात झाल्यानंतर लाँगमार्च जिंतूर-जालना -छत्रपती संभाजीनगर-नाशिकमार्गे मुंबईतील मंत्रालयावर १६ फेब्रुवारीला धडकणार आहे.