
मुलांनी संयम पाळायला पाहिजे हल्ली मुलांना संयम पाळायला शिकवावे लागत आहे. इन्स्टंटचा जमाना आहे. मुलांना कोणतीही गोष्ट झटपट हवी असते. पालक ही मुलांच्या तोंडून निघाल्या बरोबर त्यांच्या मागण्या पूर्ण करताना दिसतात.खरं तर संयमाचा आपल्या जीवनात खूप फायदा आहे. परंतु आपण पुढच्या पिढीला याचे महत्व व फायदा शिकवू शकण्यास कमी पडलो. आमच्या काळात आम्ही संयम अक्षरशः जगलो.धीर धरायला शिकलो.आम्ही लहानपणापासूनच मन मारायला शिकलो. एखादी गोष्ट पाहिजे असेल संयम ठेवून वाट पाहूनच मिळत असे,नवीन कपडे खरेदी केले का देवाला दाखवायचे व बुधवारी घालायचे नवीन कपड्यांची घडी मोडणे हा एक वेगळाच सोहळा असे आमच्या काळात महिला नवीन साडी घेतली का घरातील बहिण, नणंद, मैत्रीण यांना साडीची घडी मोडायला देत.सणवार असेल घरात गोडाधोडाचा, नैवेद्याचा स्वयंपाक घरात खाद्यपदार्थांचा घमघमाट सुटलेला असे मनावर संयम ठेवावा लागे. नैवेद्य दाखवून झाल्याशिवाय पदार्थ उष्टा करायचा नाही असा दंडक असे आणि आम्ही लहान मुलं ती पाळत असू. आता मात्र इन्सटंट खायची सवय लागली आहे आणि तसेच जीवन जगण्याची सवय लागली आहे.कोणतीही गोष्ट सहजसहजी मिळत नसे. मागितल्यावर पालक सरळ नाही म्हणत यामुळे नकार पचवायला शिकलो.आईला आवडीचा एखादा पदार्थ करून मागीतला तर ताबडतोब मिळायचा नाही.खाऊ असो वा कपडे, शालेय वह्या पुस्तके पेन्सिल भावंडे एकमेकांना शेअर करीत असू. मोठ्या भावंडाचे कपडे घट्ट झाले का आपसुकच लहान भावंडाना घालायला मिळत असे आपोआपच शेअरींग होत असे शिकवण्याची गरज पडत नसे. शाळेत सुध्दा पाण्याची बाटली वगैरे न्यायची पध्दत नव्हती. तहान लागली तर मधल्या सुट्टी होई पर्यंत मनावर संयम ठेवला जाई. शाळेत काही खाऊ नेला तर सर्वांना वाटून खाल्ला जाई. अशा प्रकारे घर, शाळा इथून संयमीतपणे कसे वागावे याचे धडे मिळत.आता शेअरींग करायला मुलांना शिकवावे लागते.
सौ.किशोरी शंकर पाटील (साहित्यीका)