जिल्हाधिकारी कार्यालयात ‘जागतिक महिला’ दिनानिमित्त महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी

छत्रपती संभाजीनगर दि ७/ ‘जागतिक महिला’ दिनानिमित्त पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालयात महिला अधिकारी,कर्मचाऱ्यांची दिवसभर आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सायंकाळी तज्ज्ञ डॉक्टरांना बोलावून त्यांना आरोग्य सल्लाही देण्यात आला.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की “महिला ह्या कुटुंबाचा आधारस्तंभ असून सर्व कुटुंबाच्या आरोग्याबरोबरच त्यांनी स्वतःचे आरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्यावे. योगा प्राणायाम, योग्य आहार, नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे”.
पुढे ते म्हणाले की, ” महिला काम करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असतात व त्याचा परिणाम त्यांच्या कार्यशैलीवर आणि आरोग्यावर होत असतो. तो होवू नये म्हणुन स्वतःच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळ द्यावा. शरीर आणि मन सुदृढ राखून कार्यक्षमता वाढवण्यासाठी आरोग्य उत्तम ठेवावे. व्यायाम, प्राणायाम, आरोग्य तपासणी, पौष्टिक आहार आणि इतर आवश्यक काळजी घेणे आवश्यक आहे”,असे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले
जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील महिला अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य विषयक मार्गद्शनपर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. स्त्री रोगतज्ज्ञ डॉ.ज्योती शेवगण- बिराजदार, आहार तज्ज्ञ डॉ.स्वप्नाली पिंपळे, दंतशल्य चिकित्सक डॉ.अमृता पवार, गौरी देशपांडे, डॉ.रेणुका लोया या उपस्थित होत्या. अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी संगीता राठोड , डॉ.सुचिता शिंदे, जिल्हा महिला बालविकास अधिकारी रेशमा चिमंद्रे,माहिती अधिकारी डॉ. मीरा ढास यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यातील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित होत्या.
डॉ.ज्योती बिराजदार यांनी सांगितले की, महिलांचे आरोग्य हे त्यांच्या हार्मोनल संतुलनावर अवलंबून असते. तर हे संतुलन राखण्यासाठी योग्य ती काळजी ,आहार आणि आरोग्य तपासणी वेळेवर करून घेणे आवश्यक आहे विविध आजारांची माहिती स्त्रीरोगतज्ञ म्हणून मार्गदर्शन यांनी केले.
डॉ. स्वप्नाली पिंपळे यांनी महिलांचा आहार आणि आहारामध्ये आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणत्या घ्याव्यात या विषयाचे मार्गदर्शन केले. यामध्ये जास्तीत जास्त पाणी पिणे ऋतूनुसार आवश्यक असलेले फळ,भाज्या आणि योगासने, प्राणायाम याचे महत्त्व अधोरेखित केले.
दंतरोग चिकित्सक डॉ. गौरी देशपांडे यांनी महिलांनी आरोग्याची काळजी घेत असताना दाताची काळजी व तपासणी याबाबत मार्गदर्शन केले.डॉ.रेणुका लोया यांनी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून महिलांची आरोग्य तपासणी करून यावर उपचारात्मक मार्गदर्शन केले .
प्रास्ताविक उपजिल्हाधिकारी संगीता राठोड यांनी केले. सूत्रसंचालन प्रवीण कन्नडकर यांनी तर आभार उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे यांनी मानले.