जेष्ठ साहित्यिक प्राचार्य रा.र.बोराडे यांचे निधन
राज्य शासनाने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रा.र. बोराडे यांना जाहीर केला होता

द फ्रेम न्यूज:
छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांचं आज सकाळी वृद्धापकाळाने निधन झालं, ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते.गेल्या आठवड्यात राज्य शासनाने विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार रा.र. बोराडे यांना जाहीर केला होता.
१९६२ साली ‘पेरणी’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला होता. त्यानंतर १९७१ साली त्यांची ‘पाचोळा’ ही कादंबरी विशेष गाजली. याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या. ‘आमदार सौभाग्यवती’ ही कादंबरी त्यांनी लिहिली त्यावर नाटकही आले, चारापाणी या कादंबरीला १९९० चा मराठवाडा साहित्य परिषदेचा श्री नरहर कुरुंदकर पुरस्कार सुद्धा मिळाला.
याशिवाय ‘तलफ’, ‘बुरूज’, यांसारख्या अत्यंत वेगळ्या धाटणीच्या कथाही त्यांनी लिहिल्या. कणसं आणि कडबा, ताळमेळ, मळणी, नातीगोती, खोळंबा तसेच शिका तुम्ही हो शिका, ही बाल कादंबरी, रहाट पाळणा, आदी साहित्य बोराडे यांनी लिहिले.१९८९ साली मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते.महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविले होते.बोराडे यांच्या पार्थिव देहावर आज संध्याकाळी छत्रपती संभाजीनगर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी जेष्ठ साहित्यिक रा.र.बोराडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. ” बोराडे सरांच्या जाण्याने साहित्यातली शहरी आणि ग्रामीण भागाची नाळच तुटली आहे”, – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे