छत्रपती संभाजीनगरात आढळले जीबीएस 'आजाराचे ५ रूग्ण'
पाच रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली

द फ्रेम न्यूज
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात (जीबीएस) आजाराचे रुग्ण वाढत आहेत तसेच छत्रपती संभाजीनगर इथं गुईलेन बॅरे सिंड्रोम- (जीबीएसचे) पाच संशयित रुग्ण आढळले आहेत.त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या पाच रुग्णांपैकी दोन रुग्णांची प्रकृती सुधारल्यानं, त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तर तीन रुग्णांवर अद्याप उपचार सुरू आहेत. या आजाराबाबत नागरिकांनी घेण्याच्या खबरदारीबाबत महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी माहिती दिली ते म्हणाले,
“जे काही पेशन्ट आपल्याकडे डिटेक्ट झालेले आहेत, त्यापैकी दोन पेशन्ट डिस्चार्ज झालेले आहेत. काही जास्त चिंता करण्याचा विषय नाहीये. यामध्ये काळजी घ्यायची म्हणजे, वेळोवेळी हात धुणे, दूषित पाणी पिण्यात येऊ नये, शिळं अन्न खाण्यात येऊ नये, आणि फिवर वगैरे, चार पाच दिवसांपेक्षा जास्त लूज मोशन्स वगैरे असेल, आणि विकनेस जाणवत असला, तरी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार घेऊ नये.’’
परंतु हा आजार नवीन नसून पूर्वीपासून रुग्ण आढळत आहेत वेळेवर निदान आणि उपचार घेतल्यास सौम्य प्रकारातील रुग्ण पंधरा ते ३० दिवसात बरा होऊ शकतो असेही डॉक्टर तज्ञांचं मत आहे. जीबीएस हा एक दुर्मिळ परंतु गंभीर आजार असून शरीरातील प्रतिकारशक्ती आणि मज्जातंतूवर हल्ला करते. ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आणि काही वेळा श्वास घेण्यासही अडचण निर्माण होते जिल्ह्याला (जीबीएस) चा फारसा धोका नाही तरीही आरोग्य यंत्रणा सतर्क आहेत. तसेच घाटी रुग्णालयात उपचाराच्या दृष्टीने आवश्यक सुविधा असल्याचे घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनीही सांगितले.
जीबीएस काय आहे? आणि लक्षणे?
हा आजार नवीन नसून पूर्वीपासून आहे या आजारांमध्ये शरीरातील प्रतिकार शक्तीत बिघाड होतो. शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा परकीय जनतेपासून संरक्षण करण्याऐवजी स्वतःच्या मज्जातंतूवरच हल्ला करते.हा आजार झाल्यानंतर गिळण्यास आणि बोलण्यास त्रास होणे, श्वास घेण्यास अडचण येणे, अशक्तपणा जाणवणे, सतत अतिसार लागणे, स्नायू नियंत्रित करण्यास त्रास होणे, हातापायांना मुंग्या येणे शरीराच्या हालचाली मंदावणे, मानसिक संतुलन बिघडणे इत्यादी जीबीएस ची लक्षणे आहेत.
जीबीएस पासून खबरदारी घ्यावी?
कोणत्याही प्रकारचे शरीरात बदल जाणवले तर त्यावर दुर्लक्ष नको.तसेच पाणी उकळून प्यावे, बाहेरचे पाणी पिणे टाळावे.उघड्यावरचे अन्नपदार्थ टाळावे.कच्चे अन्नपदार्थ खाणे टाळावे.हात स्वच्छ साबणाने किंवा हँडवॉश ने धुवावे.