" मी इथे तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी आले आहे "
प्राजक्ता माळीची मुंबईत पत्रकार परिषद


अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव घेणारे आमदार सुरेस धस चर्चेत आले आहेत. त्यांनी केलेल्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत प्राजक्ता माळीनं त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे. सुरेश धस यांनी बीडमधील कार्यक्रमांबाबत आणि इव्हेंट पॉलिटिक्सबाबत केलेल्या विधानाचा प्राजक्ता माळीनं मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत समाचार घेतला. “सुरेश धस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना जी टिप्पणी केली, त्यासंदर्भात तीव्र निषेध व्यक्त करण्यासाठी मी आले आहे. गेल्या दीड महिन्यापासून हा सगळा प्रकार चालू आहे. सगळं ट्रोलिंग, सगळ्या नकारात्मक कमेंट्सना मी सामोरी जात होते. पण माझी शांतता म्हणजे या सगळ्याला माझी मूक संमती नाहीये. माझ्यासारख्या अनेक महिला, कलाकार या सगळ्यांची ही हतबलता आहे. हे शांत राहणं तुम्हा सगळ्यांमुळे आमच्यावर ओढवलं आहे. एक व्यक्ती रागाच्या भरात काहीतरी बरळून जाते. त्या दोन वाक्यांचे हजारो व्हिडीओ होतात. तेवढेच शब्द पकडले जातात. त्यावरून यूट्यूब चॅनल्सवर हजारो व्हिडीओ बनतात. मग एका सेलिब्रिटीला त्यावर विधान करायला भाग पाडलं जातं. मग समोरची व्यक्ती पुन्हा बोलते. ही चिखलफेक चालू राहते. महिलांची अब्रू निघत राहते आणि सगळ्यांचं मनोरंजन होतं”, अशा शब्दांत प्राजक्ता माळीनं आपला संताप व्यक्त केला.