दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे ' पद्मपाणी ' जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित
"ग्रामीण मातीतून चित्रपट तांत्रिकदृष्ट्या कच्चे असले, तरी आशयाला पक्के असल्यामुळे हृदयाला भिडतात " - सई परांजपे

छत्रपती संभाजीनगर : दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे एमजीएम संस्थेतील रुक्मिणी सभागृहात बुधवारी सायंकाळी उद्घाटन झाले. यावेळी ज्येष्ठ लेखिका, नाटककार, चित्रपट निर्मिती,दिग्दर्शिका पद्मभूषण सई परांजपे यांना पद्मपाणी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले. पुरस्कारामध्ये पैठणीचा खादी शेला, स्मृतिचिन्ह सन्मानपत्र आणि दोन लाख रुपये असे स्वरूप आहे. मंचावर उपस्थित असलेले मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव विकास खारगे महोत्सवाचे मानद अध्यक्ष तथा प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजक समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, फ्रीपेसी ज्युरी चेअरपर्सन लतिका पाडगावकर, अभिनेत्री सीमा बिश्वास, एमजीएम चे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, आणि संयोजक निलेश राऊत यांची उपस्थिती होती.
भाषणामध्ये सई परांजपे म्हणाल्या ” मागील वीस वर्षा मधल्या कालखंडात मराठी चित्रपटाला पुन्हा उभारी मिळाली आहे दरवर्षी ५० ते ६० चित्रपट येतात त्यातील अनेक चित्रपट शहरी संस्कृती पासून दूर असलेल्या ग्रामीण मातीतून निपजतात त्यात होतकरू दिग्दर्शकाला वाटणारी तळमळ खाजगी व्यथा सामाजिक पोटतिडीक अशा जाणिवांमधून बऱ्याच सिनेमांचा जन्म होतो त्यातील काही चित्रपट तांत्रिकदृष्ट्या कच्चे असले तरी आशयाला पक्के असल्यामुळे हृदयाला भिडतात ” असे मत व्यक्त केलं आहे.