सरकारी मिडीया मॉनिटरिंग, खाजगी संस्थेकडे देण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध
पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय समोर निदर्शने.

छत्रपती संभाजीनगर – दि. 13 – सरकारी मिडीया मॉनिटरिंग खाजगी संस्थेकडे देण्याच्या शासनाच्या निर्णया विरोधात, आज महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई छत्रपती संभाजीनगर च्या वतीने शासनाच्या विरोधात निदर्शने करून, निवासी उप जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे आणि डिजिटल माध्यमातून बातम्यांचे संकलन व विश्लेषण करण्याचे काम खाजगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय पत्रकारितेच्या मूलभूत तत्त्वांना आणि लोकशाही मूल्यांना बाधा आणणारा असून, माध्यम स्वातंत्र्यावर गंभीर आघात करणार आहे.
पत्रकारितेचा मुख्य हेतू जनते पर्यंत सत्य व वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवणे हा आहे. मात्र सरकारकडून या कामासाठी खाजगी संस्थांना नेमण्याचा निर्णय घेतल्याने, बातम्या व अप्रत्यक्ष सेन्सॉरशिप लादली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा निर्णय सरकार विरोधी मतप्रवाह दडपण्याचा आणि प्रसार माध्यमावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते आहे.
देशाच्या लोकशाही मूल्याचे रक्षण करण्यासाठी आणि पत्रकारितेच्या स्वतंत्र भूमिकेचे स्वरक्षण करण्यासाठी आम्ही महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई छत्रपती संभाजी नगर या निर्णयाला तीव्र विरोध करत आहोत.सरकारने पारदर्शकता न ठेवता खाजगी संस्थेला हे काम सोपवणे म्हणजे माध्यमावर नियंत्रण ठेवण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न आहे. सरकारकडून लादली गेलेली ही अघोषित आणीबाणी त्वरित मागे घेण्यासंदर्भात आम्ही शासनास पत्राद्वारे कळवले होते.

मात्र आमच्या मागण्याची दखल न घेतल्याने लेखणी बंद आंदोलन व निदर्शने आज करण्यात आली.पुढील आठ दिवसात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास आम्ही मंत्रालयाबाहेर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करू ही बाब पुरोगामी महाराष्ट्रात घडू नये असे आम्हाला वाटते यासाठी आपण आमच्या मागण्याचे गांभीर्यपूर्वक विचार करून राज्य सरकारने खाजगी संस्थेमार्फत मीडिया मॉनिटरिंग करण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घेण्यात घ्यावा, असे पत्रकार संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात, मागणी करण्यात आली आहे.
यावेळी पत्रकार संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अनिल सावंत, छत्रपती संभाजी नगर जिल्हाध्यक्ष डॉ.छबुराव ताके, सुजित ताजने,आनंद अंभोरे , महेंद्र डेंगळे, जागन्नाथ बांबर्डे, भानुदास मते, रवींद्र लांडगे,राज ठाकरे, राजू पडवळ, फिरोज भाई,फिरोज शेख,एच. आर.लहाने, चंद्रकांत चाबुकस्वार, देविदास कोळेकर,अजमद पठाण यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.