लोकप्रतिनिधींनी आराखड्याचा अभ्यास करुन सूचना कळवाव्यात - अजित पवार

द फ्रेम न्यूज
पुणे : जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या आणि रोजगारांची संख्या लक्षात घेऊन सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये वाढ करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने महामेट्रोकडून सादर पुढील ३० वर्षाच्या १ लाख २६ हजार ४८९ कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक वाहतूक आराखड्यामध्ये काही बदल, सूचना असल्यास सर्व लोकप्रतिनिधींनी येत्या ७ ते १० दिवसांमध्ये महामेट्रोला लेखी स्वरुपात कळवाव्यात, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत.विभागीय आयुक्त कार्यालयात पुणे महानगर प्रभाव क्षेत्रातील सर्वंकष वाहतूक आराखडा अद्ययावत करणे व पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यासंदर्भात आयोजित आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार सुप्रिया सुळे, मेधा कुलकर्णी, सुनेत्रा पवार, आमदार अमित गोरखे, चेतन तुपे, योगेश टिळेकर, विजय शिवतारे, भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, बापूसाहेब पठारे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ- मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, पोलीस अधीक्षक पंकज देशमुख आदी उपस्थित होते.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले, “लोकप्रतिनिधींना मेट्रोने सादर केलेल्या आराखड्याचा अभ्यास करुन त्यांना वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगाने वाहतूक कोंडी कशी कमी करता येईल त्यासाठी नवीन मार्ग, पर्यायी रस्ते आदींबाबत मेट्रोकडे सूचना कळवाव्यात. महामेट्रोकडून त्याबाबत तांत्रिक तसेच आर्थिक व्यवहार्यता तपासून आवश्यकतेप्रमाणे आराखड्यात बदल करण्यात येतील”.निर्देशानुसार दर पाच वर्षांनी वाहतूक आराखडा अद्ययावत करणे आवश्यक आहे. त्यानुसार आराखडा तयार करण्यात आला असल्याचे श्री. हर्डीकर यांनी सांगितले.यावेळी श्रीमती सुळे यांनी वाहतूक विकास आराखडा तयार करताना पुरंदर येथील विमानतळाच्या जागेच्या अनुषंगाने सूचना केली आहे.