पालकांनी स्वतः वाचावे मग मुलांवर वाचनाचे संस्कार करावे- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी
वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी लहान लहान स्वरुपात ग्रंथोत्सव आयोजीत करुन मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवावीत

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते ग्रंथोत्सवातील ग्रंथदालनांचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी ग्रंथदालने असून तेथे ग्रंथ प्रदर्शन व विक्रीची सोय आहे. ग्रंथप्रेमींनी ग्रंथ पाहण्या व खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती.
दीपप्रज्वलनाने मुख्य सोहळ्यास सुरुवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी स्वामी यांनी वाचन संस्कृतीचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले की, आपण संतांची भुमि म्हणतो मात्र प्रत्यक्षात संतांचे साहित्य वाचत नाही. बौद्धिक प्रगल्भतेसाठी वाचन करणे गरजेचे आहे. कविता, गीत, कथा, कादंबऱ्या, वैचारीक ग्रंथ, क्रमिक पुस्तके असे कोणत्याही स्वरुपातील साहित्य हे संस्कारासाठी महत्त्वाचे असते. अनेक घरांमध्ये शोकेस मध्ये पुस्तके ठेवलेली असतात. पुस्तके हे शोभेची वस्तू नसून ते वाचण्यासाठी व आत्मसात करण्यासाठी आहे. वाचन संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी लहान लहान स्वरुपात ग्रंथोत्सव आयोजीत करुन मुलांपर्यंत पुस्तके पोहोचवावीत. त्यांची व ग्रंथांची भेट घडवावी,असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी केले.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन आज जिल्हाधिकारी स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. दासू वैद्य हे होते. तर ज्येष्ठ साहित्यिक प्रकाशक बाबा भांड, डॉ. रा. शं. बालेकर, गुलाबराव मगर, अण्णा वैद्य, प्रशांत गौतम, पत्रकार सुहास सरदेशमुख, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे आदी उपस्थित होते.
ग्रंथोत्सवाचा प्रारंभ क्रांती चौकातून ग्रंथदिंडीद्वारे करण्यात आला. मानव विकास आयुक्तालय उपायुक्त मिलिंद नारिंगे, ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, साहित्यिक डी.एस.काटे, कुंडलिक अतकरे आदी मान्यवर तसेच शालेय विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी विविध वेषभूषा करुन आपला सहभाग दिला.
“मुले वाचत नाहीत अशी तक्रार हल्ली पालक करतात. मुलांवर वाचनाचे संस्कार करायचे तर पालकांनी आधी पुस्तकं वाचायला हवीत, तरच मुले त्यांचे अनुकरण करतील, आणि पुढच्या पिढीत वाचन संस्कृती रुजेल,” – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी